Online Fraud : नागरिकांनो सतर्क राहा! Digital Arrest ऑनलाईन घोटाळ्याचा नवा प्रकार
इंटरनेटच जाळ आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. इंटरनेटचा आयुष्यात शिरकाव झाल्यामुळं आयुष्य सोपं झालं आहे, पण त्याचबरोबर अडचणींमध्येही वाढ झाली आहे. आजच्या 21 व्या युगात ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. डिजिटल अरेस्ट हा आता एक नवीन प्रकार उदयाला आला आहे.डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरुपात अटक. मात्र डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार नसतो. कुठल्याही तपास यंत्रणेला तुमच्या घरी तुम्हाला डिजिटली अटक करता येत नाही तुम्हाला कोणीही अशा प्रकारे अटक करू शकत नाही. मात्र या डिजिटल अरेस्ट ला जर तुम्ही बळी पडलात तर मात्र यामध्ये तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा गमावून बसू शकता. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने याबाबत अलर्ट राहणं आवश्यक आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय?
डिजिटल अरेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती आपण पोलीस किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून फोन करते. तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली आहे असे सांगतात. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं. या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर पैशाची मागणी केली जाते. बऱ्याच वेळेला व्हिडीओ कॉल करुन पोलीस स्टेशन असल्यासारखं भासवण्यात येतं. तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकला जातो आणि तुमची फसवणूक केली जाते. तर त्यासाठी हे सायबर भामटे तीन पातळ्यांवर काम करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास बसतो.
1)सायबर भामटे तुमची सगळी माहिती काढतात. तुम्ही कुठे फिरायला गेला होतात, तुमची मुलगी कोणत्या शाळेत शिकते, तुम्ही कोणती नवीन वस्तु खरेदी केली, याबद्दल तुम्हाला ते माहिती सांगतात त्यामुळे तुम्हाला खरंच वाटायला लागतं की हे तपास अधिकारी आहेत.
2)सायबर भामटे आपण सीबीआय, पोलीस स्टेशन किंवा नार्कोटिक्समधून बोलतोय, असं सांगून व्हिडीओ कॉल करतात. व्हिडीओ कॉल करण्याआधी पोलीस स्टेशनसारखा किंवा सरकारी ऑफिससारखा सेटअप केला जातो. तुमच्याशी बोलणारी माणसंसुद्धा पोलिसांचे कपडे घालून बसलेले असतात. आणि पोलिसांचे कपडे घालून बसलेले हे लोक अगदी सराईतपणे तुमच्याशी बोलतात. बोलताना तुम्हाला धडाधड कायद्याची कलमं सांगतात. त्यामुळे तुमचा त्यांच्यावर अधिकच विश्वास बसतो.
3) सायबर भामटे तुमच्यावर वेळेचा दबाव आणतात. या गुन्ह्यातून बाहेर यायचं असेल तर पैशांची मागणी करतात. आता लगेच निर्णय घ्या, लगेच पैसे भरा, नाही तर तुम्हाला घरात येऊन अटक करू असं सांगितलं जातं. तुम्हाला घरी येऊन अटक करतो असं सांगितल्यावर आपल्या मनात भीती निर्माण होते. या सगळ्याचा तुमच्या मानसिक स्थितीवर इतका वाईट परिणाम होतो की तुम्ही पैसे देऊन मोकळे होता. आणि त्यांचे काम साधले जाते. आपल्याला यात लाखो रुपयांचे नुकसान होते. गेल्या वर्षी अशा डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये तब्बल 1776 कोटींचं नुकसान झालं होतं. मुंबईसारख्या शहरात हा आकडा बराच मोठा आहे.
जबाबदारीने आणि सतर्कतेने वागा
कुठलीही तपास यंत्रणा म्हणजे पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स किंवा आणखी कुठलीही तपास यंत्रणा कधीही फोन करून, व्हिडीओ कॉल करून चौकशी करत नाही कुठलीही सरकारी यंत्रणा किंवा सरकारी कार्यालय फोन किंवा व्हिडीओ कॉल करुन तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारत नाही. कुठल्याही तपास यंत्रणा किंवा सरकारी यंत्रणा कधीही फोन करुन तुमच्याकडे पैशांची मागणी करत नाहीत. त्यामुळे असा फोन आलाच तर अजिबात घाबरुन जाऊ नका आणि घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमच्याबाबतीत असं घडलंच तर कुटुंबीयांशी आणि नातेवाईकांशी चर्चा करा.
शक्य असल्यास त्या व्हिडीओ कॉलचा स्क्रीन शॉट घ्या किंवा रेकॉर्ड करा. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा.तुम्ही मेहनतीनं कमावलेला पैसा कुठल्याही परिस्थितीत सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांना देऊ नका. एकदा का पैसे गेले, की ते पुन्हा मिळवणं कठीण होऊन जातं. कारण हे सायबर भामटे कुठल्याही राज्यात, कुठल्याही देशातून अशा प्रकारचे काळे धंदे करत असतात. त्यांना पकडणे अशक्य असते.महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा क्रमांक आहे. दिल्ली पोलिसांनीसुद्धा 1930 क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. याशिवाय थेट 112 क्रमांकावरही फोन करू शकता, आणि असा काही प्रकार जर आपल्या सोबत झाला तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. आपले पैसे सुरक्षित ठेवा.