BMC News : मुंबईतील सफाई कामागारांना वाढीव क्षेत्रफळाची 12 हजार घरं मिळणार
मुंबई महानगरपलिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर झाला. मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला.यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 74 हजार 427 कोटी रुपयांचा आहे. याच पार्श्वभूमीवर मनपाने (मुंबई महानगर पालिका) सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला. सफाई कामगारांची मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे आता मनपाने सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून 'आश्रय' योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या कामगारांसाठी वाढीव क्षेत्रफळाची (३०० चौ.फूट) घरे उपलब्ध करून देण्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे. आतापर्यंत ५ हजार ५९२ कामगारांना घरे देण्यात आली असून आगामी वर्षात १२ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेत सद्य स्थितीत २७ हजार ९९२ कामगार कार्यरत आहेत. आतापर्यंत यापैकी सुमारे ५ हजार ५९२ कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांच्या ४६ पैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास केला जात आहे. योजनेसाठी २०२४-२५ मध्ये ८५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. महापालिकेने आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
योजनेअंतर्गत पालिकेने ३० ठिकाणच्या पुनर्विकासासाठी कार्यादेश दिले आहेत. त्यापैकी २३ ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित ७ ठिकाणची कामे लवकरच हाती घेण्यात येत आहे.