Eknath Shinde
Eknath Shinde

सांगलीत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले, "बाळासाहेबांनीही सांगितलं होतं..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ते सांगलीत महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

काँग्रेसने गेले ५०-६० वर्षे संविधान दिन साजरा केला नाही. पण संविधान दिन केंद्र सरकारने सुरु केला. काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला. बाबासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही. बाबासाहेब म्हणायचे, काँग्रेस हे जळतं घर आहे, त्यापासून लांब राहा. बाळासाहेबांनीही सांगितलं की, काँग्रेसपासून दूर राहा. पण या काँग्रेसला खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं. म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी एक उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं. जे सरकारमध्ये बसले होते, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले होते. या जनतेशी त्यांनी बेईमानी केली. त्यांचा विश्वासघात केला. म्हणून लोकांना न्याय देणारं आणि लोकांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ते सांगलीत महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, आमचं सरकार सर्वसामान्यांना मदत करणारं आहे. घरात बसून सरकार चालवता येत नाही. एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करतो. अजित पवार पहाटे काम सुरु करतात. देवेंद्र फडणवीस दिवसभर काम करतात. २४ तास आपलं सरकार चाललं ना. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येत नाही. उंटावरुन शेळ्या हाकता येत नाही. मराठा आरक्षण द्यायचं ज्यांच्या हातात होतं, त्यांनी ते दिलं नाही. मराठा आरक्षणाला मूक मोर्चा म्हणून ज्यांनी टिंगल केली, ते या महाविकास आघाडीत आहेत. आमच्या सरकारने विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के महाराष्ट्र आरक्षण दिलं. हे आरक्षण टिकू नये, म्हणून महाविकास आघाडीतले लोक कोर्टात गेले. पण आमचं सरकार मराठा आरक्षण टिकवून दाखवणार. कायद्याच्या चौकरीत बसवून दाखवणार, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.

कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, अनेक वर्ष नियम होते. पण आमच्या सरकारने कुणबी प्रमाणपत्र दिले. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णय आमच्या सरकारने मराठवाड्यात घेतला. त्यामुळे तुम्ही सावध राहिलं पाहिजे. त्यांच्या हातात होतं त्यांनी दिलं नाही. आता तुम्हाला दिल्यानंतर विरोधक सांगतात, आरक्षण आता टिकणार नाही. लोकांची दिशाभूल करायची. त्यांच्यात संभ्रम निर्माण करायचा. मी मुंबईत शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराच यांचे पदस्पर्श करून शपथ घेतली होती की, या राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन दिलं.

मुस्लिम समाजात काही लोक भीती पसरवत आहेत. पण मुस्लिम समाजही शिवसेनेसोबत आहेत. माझ्या घरातही माझा सारथी म्हणून काम करणारे मुस्लिम समाजाची मुलं आहेत. आमच्याकडे कोणतेही भेदभाव नाही. बाळासाहेबांनी शाबीर शेख यांना मंत्री केलं होतं. एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारला मंत्री केलं. देशातील ८० टक्के लोकांना मोफत रेशन देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्यात सर्वधर्मीय लोक आहेत. त्यात वर्गवारी केली नाही. केंद्राच्या योजनांचा लाभ हिंदू समाजासारखाच मुस्लिमांनाही मिळतो. विरोधक घाबरवण्याचं काम करतात. काँग्रेसने मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर केला आहे. पण आपलं सरकार अशाप्रकारे काम करत नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com