Eknath Shinde
Eknath Shinde

"२६ तारखेला रावणरुपी महाविकास आघाडीच्या लंकेला जळून खाक करा", अमरावतीत CM शिंदेंची तोफ धडाडली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. राणा दाम्पत्याला १४ दिवस तुरुंगात ठेवलं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी जय श्रीरामाचा नारा दिला. मागील सरकारने अंहकारी रावणासारखी कारवाई केली होती. हनुमानजीने अहंकारी रावणाची लंका जाळली होती. आता अमरावतीची जनता येणाऱ्या २६ तारखेला रावणरुपी महाविकास आघाडीच्या लंकेला जळून खाक करेल आणि नवनीत राणा विक्रमी मताधिक्क्यानं विजयी होतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. लोकांचा विचार संपला की, अमित शहांचे विचार आणि काम सुरु होतं. याचा अनुभव मी घेतला आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाची दिशा बदलण्याचे मजबूत निर्णय घेण्यात आले, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये कलम ३७० हटवणं अशक्य होतं, असं अनेक लोकांना वाटत होतं. परंतु, मोदींच्या नेतृत्वात अमित शहांच्या इच्छाशक्तीमुळं हे शक्य झालं. काही लोक म्हणत होते, दंगल होईल, काश्मीर जळेल. पण काही झालं का. अमित शहांनी अशी जादू केली की, सर्व शांततेत आपला काश्मीर आपल्यासोबत आला. याचं पूर्ण श्रेय अमित शहांना जातंय.

काश्मीर आज विकासाच्या दिशेनं जात आहे. काश्मीरमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन उभारणार आहोत. पण ओमार अब्दुला मुंबईत आले होते, ते बोलले महाराष्ट्र भवन काश्मीरमध्ये होऊ देणार नाही. आता आमच्यासोबत नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. महाराष्ट्र भवन उभारायला आता कोणीच रोखू शकणार नाही.

सत्तेच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊन हिंदुस्थानचा गळा घोटणाऱ्यांना शहा सोडणार नाहीत. या देशाला महाशक्ती बनवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी या जनतेनं दिली आहे. म्हणून आम्ही म्हणतो, अब की बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार. भाजप इतका मजबूत झाला आहे की, २०१४ पासून १० वर्ष लोकांना न्याय देण्याचं काम भाजप करत आहे.

मोदी पाहिजे की राहुल गांधी, असं विचारल्यावर छोटा मुलगाही म्हणेल, मोदी पाहिजे. कारण मोदींनी दहा वर्षात केलेलं काम काँग्रेसला ५० वर्ष जमलं नाही. काँग्रेसला मोदींनी केलेलं काम १०० वर्षातही जमणार नाही. मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेला ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणलं आहे. ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी संकल्प केला आहे. राहुल गांधी थंड हवा खायला विदेशात जातात आणि मोदींची बदनामी करतात.

स्वप्नातही विचारलं तर लोक मोदींचंच नाव घेतील. देशाची सुरक्षा मजबूत करण्याचं काम मोदी-शहा करत आहेत. मोदी-शहांच्या विश्वासामुळे महायुतीची गाडी भरधाव वेगानं धावत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. मोदींच्यात गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. देशाचा पंतप्रधान होण्याच अधिकार फक्त मोदींनाच आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com