मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री शिंदेंचा दिलासा, अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी
भाजप नेते मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला आहे. कंबोज यांच्या सांताक्रुझमधील चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खास बाब म्हणून अशाप्रकारचा निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे उदाहरण म्हणून मानले जाऊ नये, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मोहीत कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांना पालिकेनं नोटीस पाठवली होती. त्यानंतर कंबोज यांच्या घरी मुंबई महापालिकेचं एक पथक दाखल झालं होतं. सांताक्रूझ येथे ज्या इमारतीत कंबोज यांचं निवासस्थान आहे, त्या इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती. कंबोज यांच्या घरात पालिका पथक दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यावेळी घराची केवळ पाहणी करण्यात आली होती.
मात्र काही महिन्यातच सरकार बदलले. राज्यात शिंदे-फडणवीसांच्या युतीचे सरकार आल्यानंतर आता मोहीत कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंबोज यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येत आहे.