Eknath Shinde
Eknath Shinde

४२ डिग्री तापमानात CM शिंदे उतरले कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात; म्हणाले, काँग्रेसचा सुफडा साफ..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करुन काँग्रेसवर तोफ डागली.
Published by :

काँग्रेसला जाहीरनामा घोषित करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनामा जाहीर करायला हवा. त्यांनी देशाला अधोगतीकडे नेलं आहे. काँग्रेसने देशाला खड्ड्यात घातलं आहे. मोदींनी दहा वर्षात केलेलं काम आपल्यासमोर आहे. धेर्यशील मानेंना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. देशाचा विकास डोळ्यासमोर ठेऊन मोदी काम करत आहेत. २०१४ पूर्वी दंगली, घोटाळे, बॉम्बस्फोट होत होते. २०१४ नंतर एकतरी दंगल, बॉम्बस्फोट, घोटाळा झालाय का, मोदींवर आरोप करण्याची हिंमत कुणी दाखवू शकत नाही. त्यांच्यावर एकही डाग नाही. २०१४ आणि २०१९ ला आरोप केले, जनतेनं सुफडा साफ केला. २०२४ लाही विरोधकांची हीच परिस्थिती होणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत धेर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, कोल्हापूर आणि हातकणंगले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण इतक्या संख्येनं जमा झाला आहात. ४२ डिग्री तापमान असताना तुम्ही आलात, तुम्हाल सलाम ठोकला पाहिजे. कोल्हापूरकरांनी हा अलोट महासागर पहिल्यांदा बघितला असेल. संजय मंडलिक आणि धेर्यशील माने यांच्या पाठिशी खंबीरपणे जनता उभी आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, दोन्ही उमेदवार महायुतीचे असले पाहिजे. त्यामुळे ही जनता त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे. राम मंदिराचं बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. कोल्हापूर आणि आपलं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. कोल्हापूरमध्ये जेव्हा संकट आलं, महापूराची आपत्ती आली, तेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन कोल्हापूरकरांच्या पाठिशी उभे राहिलो. ही निवडणूक एका व्यक्तीची किंवा मतदार संघाची नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे.

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकीत आपण वेगवेगळे लढतो, असं दादांनी सांगितलं, पण या निवडणुकीत एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचा विकास डोळ्यासमोर ठेऊन ही निवडणूक लढवतोय. मोदींनी या देशासाठी जे केलं आहे, ते आपल्या सर्वांना माहित आहे. मोदींनी या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. देशाला जगभरात मान सन्मान मिळतोय, तो पंतप्रधान मोदींमुळे मिळत आहे. आपण विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललो आहे. आधीचं सरकार घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारं सरकार होतं.

आता सरकार बदललं आहे. फेस टु फेस काम करणारं सरकार आहे. रात्रंदिवस काम करणारं सरकार आहे. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा लवकर पहाटे उठून काम करतात. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. जे ५०-६० वर्षात झालं नाही, ते मोदींनी १० वर्षात करुन दाखवलं. म्हणून आपल्याला त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com