Maharashtra Weather News : उत्तर भारतात थंडीचा कडाका, महाराष्ट्रात ढगाळ हवामान; पुढील 48 तास महत्त्वाचे
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या खूप कडाक्याची थंडी आहे, मात्र काही भागांमध्ये पावसाची हजेरी देखील आहे. या बदलांमुळे संपूर्ण देशातील हवामानावर परिणाम होत असून, दक्षिण भारताच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही बदलत्या हवामानाचे दृश्य दिसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत ही स्थिती कायम राहणार असून, पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका अधिक तीव्र असेल.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहील, तर धुक्याची चादर दृश्यता कमी करेल. हवामान विभागानुसार, शहरात सरासरी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील. देशातील काही भागांमध्ये किमान तापमान 10 अंशांहून अधिक असल्यानं थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे, तरीही गारठा कायम आहे. काही ठिकाणी धुक्याची चादर तर, काही ठिकाणी दवबिंदू दिसून येत आहेत. हिमालयातील वाऱ्यांची सतत बदलणारी स्थिती पाहता, महाराष्ट्राच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहणार असून, कोकणात काहीसा दमट वातावरण दुपारच्या प्रहरांमध्ये पाहायला मिळेल.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या साप्ताहिक अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत मध्य आणि उत्तर भारतात धुक्यामुळे परिस्थिती गंभीर होणार आहे. 5 ते 8 जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये थंडीची लाट तीव्र होईल. राजस्थानमध्ये 5 ते 9 जानेवारीदरम्यान, विशेषतः पूर्व राजस्थानात थंड वारे वाहणार आहेत. 10 जानेवारीला थंड वाऱ्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. हिमालयाच्या पश्चिमेकडे पावसाची शक्यता असून त्याचा परिणाम देशभरच्या हवामानावर दिसून येतो आहे.
काश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरु असून, जम्मूमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. काश्मीरच्या खोऱ्यात तापमान उणे 5 अंशांखाली गेले असून, गुलमर्ग हा भाग सर्वाधिक थंड आहे. पुढील 48 तासांत हिमवृष्टीची शक्यता आहे. धुक्याचं प्रमाण वाढल्यामुळे उत्तर भारतातील वाहतूक मार्ग आणि सेवा प्रभावित झाल्या आहेत. देशभरातील बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी, विशेषतः थंड हवामान जास्त असलेल्या प्रदेशांमध्ये, स्वच्छता, गरम कपडे आणि वाहतुकीबाबत दक्षता घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस हवामानावर लक्ष ठेवणे आणि आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.
