Cold Wave  : राज्यात येणार थंडीची लाट, देशाच्या वातावरणात मोठा बदल

Cold Wave : राज्यात येणार थंडीची लाट, देशाच्या वातावरणात मोठा बदल

नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातील राज्यात बराच पाऊस होता, मात्र आता महाराष्ट्रासह देशाच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • राज्यात येणार थंडीची लाट,

  • देशाच्या वातावरणात मोठा बदल

  • मुंबईचे किमान तापमान 20 च्या खाली

नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातील राज्यात बराच पाऊस होता, मात्र आता महाराष्ट्रासह देशाच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. नेहमी उष्णतेच्या धारांनी त्रस्त असलेले मुंबईकर जिची आतुरतेने वाट पहात होते, त्या थंडीचे अखेर आगमन होताना दिसत आहे. मुंबईत आता थंडीची चाहूल लागली आहे. तापमान किमान 20 अंशांपर्यंत खाली गेलं असून येत्या 2 दिवासंत तापमान 18 ते 19 अंशांपर्यंत राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वेटर, जॅकेट बाहरे काढून मुंबईकरांना थंडीचा आनंद लुटता येणार आहे. तसेच राज्यातील विविध भागांतही थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरत असून येते 2-3 दिवस, सोमवापर्यंत गारठा टिकून राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

राज्यात येणार थंडीची लाट

राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असून त्यामुळे थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे. राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. थंडीचा कडाका वाढणार असल्याने कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे.

शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान 20 च्या खाली गेलं, ते 18.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हेच वातावरण आणखी 2-3 दिवस कायम राहणार असून शनिवार-रविवार हे वीकेंडचे 2 दिवस तसेच सोमवारपर्यंतही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 2-3 दिवसांत थंडीचा पार खाली घसरून 16 ते 17 अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान 14 ते 20 नोव्हेंबर आणि 21 ते 27 नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते.

नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक मध्ये थंडीचा कडाका कायम आहे. शहरातील तापमान गेल्या आठवड्याभरापासून 10 अंशाच्या आसपास आहे. तसेच पुढच्या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. नासिक थंडीने गारठले असून गोदावरीवर धूक्याची चादर पसरल्याचे बघायला मिळाले. वाढत्या थंडीमुळे शहरात सर्वत्र धुक पसरलं होतं.

मुंबईत घसरली हवेची गुणवत्ता

मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे, पारा घसरला असून थंडीचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळी आहे. एक्युआय आता 187 वर धोकादायक श्रेणीत पोहोचला आहे. मुंबईत आता पुन्हा धूरकट वातावरण तयार झालं, तसेच दुपारी ऊकाडाही वाढलाय.

जगातील प्रदुषणग्रस्त शहरांच्या यादीत मुंबई सध्या 52 व्या क्रमांकावर आहे. हवेतील पीएम 2.5 चं प्रमाण 108 वर पोहोचलंय तर पीएम 10 चे प्रमाण 138 वर पोहोचलं असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईमधे मोठी विकासकामे आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धूलिकण हे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळले आहेत त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या या वायुप्रदूषणावर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदुषण महामंडळाचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com