Weather Update : ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; राज्यात हवामानाचा मूड बदलला
राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत असून, ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून हवामानाचा पॅटर्न बदलला असून, अनेक भागांमध्ये पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, थंडी अचानक गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगांची गर्दी वाढत असून, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमानही अपेक्षेपेक्षा जास्त राहात आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा मोठा अलर्ट देण्यात आला असला तरी, त्या शीतलहरी पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे जाणवत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात थंडी कायम राहणार असली तरी हवामानात चढउतार पाहायला मिळणार आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वायू प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. पुणे, मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी हवा अधिक विषारी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि दम्याचे त्रास वाढत आहेत. डॉक्टरांनी श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तापमानाबाबत बोलायचे झाल्यास, धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि जळगाव येथे ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, राज्यात किमान तापमानातील वाढ काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.
देशभरातील हवामान स्थिती पाहता, १६ ते १९ जानेवारी दरम्यान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच १८ आणि १९ जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
