Weather Update : थंडी पुन्हा सक्रिय! राज्यात शीतलहरीचा इशारा, किमान तापमानात मोठी घसरण
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र काही काळ थंडी कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र आता भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी शीतलहरीचा मोठा इशारा दिला असून, येत्या काही दिवसांत थंडी पुन्हा जोर धरू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. विशेषतः धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. गोंदिया येथे 9.8 अंश, तर यवतमाळ आणि परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
मात्र दुसरीकडे, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत असून, कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तापमानातील तफावतीमुळे बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला, ताप, तसेच श्वसनाशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा विभागात सध्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही वाढ तात्पुरती असून त्यानंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल. यंदा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडी अनुभवायला मिळाली असून, पुढील काही दिवसांत गारठा पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामानातील या बदलांसोबतच वायू प्रदूषणातही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत वायू प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिल्ली आणि आसपासच्या भागांत पावसाचा इशारा दिला असून, त्यामुळे प्रदूषणात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सक्रिय होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
