MNS Protest at Disney Hotstar Office
MNS Protest at Disney Hotstar Office

MNS Hotstar Protest: तमिळ, तेलगू, कन्नड, भोजपुरीत समालोचन मग मराठीत का नाही? मनसेचं खळ्ळखट्याक

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. हॉटस्टार या ओटीटी वाहिनीच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.
Published by :
Published on

मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. यावेळी डिस्ने हॉटस्टार ओटीटी वाहिनीविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणात मराठी समालोचनाचा पर्याय नसल्यानं मनसेनं जाब विचारला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि मनसे कार्यकर्त्यांनी हॉटस्टारच्या कार्यालयात ठिय्या मांडला. डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयातील काचा महाग असल्याचं म्हणत थेट धमकी अमेय खोपकर यांनी दिली.

मनसे का झाली आक्रमक?

डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy)  प्रसारण केलं जाणार आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्चमपर्यंत हे सामने होणार आहेत. हॉटस्टारवर या सर्व सामान्यांचे थेट प्रक्षेपण केलं जाते. यावेळी डिस्ने हॉटस्टार इतर प्रादेशिक भाषांमध्ये समालोचनाचा पर्याय उपलब्ध असतो. तमिळ, तेलुगू, मल्याळम, हरयाणवी, भोजपुरी या प्रादेशिक भाषांमध्ये डिस्ने हॉटस्टारवर समालोचनाचा पर्याय आहे. मात्र, मराठी भाषेचा पर्याय हॉटस्टारवर नाही. त्यामुळे मनसेने आक्रमक होत डिस्ने हॉटस्टारच्या लोअर परळमधील कार्यालयात जाऊन जाब विचारला.

डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात काय घडलं?

डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना तीन तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे मनसैनिक चांगलेच संतापले. मनसैनिकांचा पारा चांगलाच चढला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली.

महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी लोकांनीच करायचा - अमेय खोपकर

भेटायला नाही तर धमकी द्यायला आलो आहोत असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी भांडावं लागतं, झगडावं लागतं ही शोकांतिका असल्याचं खोपकर म्हणाले. ते म्हणाले इथे आल्यावर मराठी माणसाला संवाद साधण्यासाठी पुढे केलं जातं मात्र व्यवस्थापक अमराठी आहेत. जोपर्यंत डिस्ने हॉटस्टारवर दाखवल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांचं समालोचन मराठीत होत नाही हे लेखी दिलं जात नाही. ते आम्ही लेखी घेऊनच जाणार आहोत. महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी लोकांनीच करायचा इतरांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही.

मराठीत समालोचन सुरु करण्यात येणार असल्याची डिस्ने हॉटस्टारने दिली ग्वाही

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मराठीत समालोचन सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही डिस्ने हॉटस्टारने दिली असल्याची माहिती अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डिस्ने हॉटस्टारने या संदर्भात मनसेला पत्र दिलं आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, महाराष्ट्रात डिस्ने हॉटस्टारवर मराठीत समालोचन सुरु करणार आहोत.

मराठी माणसाला मनसेकडून आवाहन

सामने बघताना समलोचन मराठीत ऐकण्याचं आवाहन खोपकरांनी यावेळी केलं आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com