Communist Party of India: माकपकडून मविआकडे विधानसभेसाठी 12 जागांची मागणी
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यात 12 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्री.शरद पवार, श्री.जयंत पाटील, श्री.उद्धव ठाकरे, श्री.नाना पटोले, श्री.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती
मात्र जागावाटप प्रक्रियेतुन आम्हाला डावले जात आहे तसेच सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागा तीन मुख्य पक्षांमध्ये वाटून घेतल्या व त्यानंतर इतर पक्षांच्या बरोबर त्यांचा केवळ पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा केली. माकपने तेव्हाही महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचे हे असे करणे चुकीचे असल्याबद्दल आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. किमान विधानसभेच्या जागावाटपात तरी अशा प्रकारे आपसांत तीन पक्षांनी जागा वाटून घेऊन नंतर डावे पुरोगामी पक्ष व संघटनांबरोबर चर्चा सुरू करण्याची चूक होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल विनंती केली होती.
मात्र लोकसभेच्या वेळेस जे झाले तेच विधानसभेच्या वेळेस घडताना आज दिसत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पार्श्वभूमीवर जाहीर मागणी करतो की विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणूक लढण्याबद्दल त्यांचे आग्रह अत्यंत प्रामाणिकपणाने विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल असे माकप नेते अजित नवले यांने सांगितले आहे.