Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या प्रश्नावर एकत्र येत आंदोलन छेडल्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच मुंबईत "मराठी विजय दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या एका विधानावरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात, "मारहाण करतानाचा व्हिडिओ काढू नका," असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विधानामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो आणि समाजात द्वेष निर्माण होऊ शकतो, असा आरोप करत तीन वकिलांनी मुंबई येथे मुंबईतील पोलीस महासंचालकांकडे (DGP) तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा आणि आशिष राय या वकिलांनी स्वाक्षरी केलेली आणि मराठीत लिहिलेली तक्रार सादर करून त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत राज ठाकरे यांचे वक्तव्य भडकाऊ आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच हे विधान महाराष्ट्रातील शांतता भंग करणारे असून, त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित वकिलांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी स्पष्ट मागणी केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. राज ठाकरे यांच्यावर खटला दाखल होतो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.