महायुतीत रोज महाभारत चाललंय, जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार? नाना पटोलेंचा मोदी सरकारला थेट सवाल
Nana Patole Press Conference : महाराष्ट्रात उष्णाघातामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. शेतकरी, तरुण आत्महत्या करत आहेत. नीटच्या परिक्षेचा घोळ सुरु आहे. निवडणुका झाल्या आहेत. आता महाराष्ट्राची प्रतिमा, जनतेचं रक्षण हे सर्वात महत्त्वाचं मुद्दे आहेत. आम्ही हे मुद्दे घेऊन चालतोय. बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत असेल, तर आम्ही काय करु शकत नाही. आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही. उष्माघाताने किती लोक मरतात, याचा आकडा सरकारने जाहीर करावा. पिण्याच्या पाण्यासाठी लोक उष्माघाताने मरत आहेत. सरकारला चिंताच नाही. मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया करुन ठेवले आहेत. महाराष्ट्रात काय चाललंय, यावर चर्चा करण्याची गरज आहे. तुमचं मोदी सरकार आलं आहे ना. तुम्ही सत्तेत आहात. बहुमताचं सरकार आहे. त्यांच्याच महायुतीत रोज महाभारत चालतय. जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार? हा मूळ प्रश्न आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले, नक्षलवादावर चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या सरकारने जनतेची काळजी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही. बोगस बियाणे मिळत आहेत. शासनाकडे बीज निर्माण करण्याचं महामंडळ आहे, पण त्यांच्याकडे बीज नाही. आंध्रप्रदेश, गुजरातच्या कंपन्या शेतकऱ्याला लुटत आहेत. यावर कुणाचं लक्ष नाही, शेतकऱ्याला मायबाप राहिला नाही. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे. भ्रष्टाचार, राजकीय ओरड घातल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना कळत नसेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. काँग्रेस हे सर्व प्रश्न घेऊन लढेल, कोण काय बोलतोय, त्याच्याकडे काँग्रेसचं लक्ष नाही. काँग्रेसचं प्रश्न जनतेच्या प्रश्नावर आहे. जनतेला न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यासाठी काँग्रेस लढत राहील.
प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, सर्वांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत, त्याला दुमत नाही. काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीवेळी आपली भूमिका मांडली होती. मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याचापेक्षाही चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं. विधानसभेलाही प्रत्येकाने विचार करावा, एव्हढच काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत.
स्वाभाविकपणे काँग्रेस आता टार्गेटवर आहे, असं मी गेल्या दोन दिवसापासून पाहतोय. निवडणुकीला चार-पाच महिन्यांचा वेळ आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. रवींद्र वायकरांच्या निवडणुकी संदर्भाता निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलं आहे, ईव्हीएम मशिनला कोणताही ओटीपी लागत नाही, असं त्यांनी म्हटलंय, यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे. मला याबद्दल सांगायचं काही कारण नाही, असंही नाना पटोले म्हणाले.