Ramesh Chennithala : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या मुंबई दौऱ्यावर
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या भूमिकेबाबत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सूर लावणारी काँग्रेस आपली भूमिका बदलणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व दिलं जात असून, याच दौऱ्यात मुंबई महापालिकेसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या काँग्रेसची निर्णायक बैठक
उद्या रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत
मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती
युती करायची की स्वबळावर लढायचं
ठाकरे बंधूंशी हातमिळवणी करायची की नाही
या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
ठाकरे बंधूंसोबत जाणार का काँग्रेस?
सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसही या युतीत सहभागी होणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंशी हातमिळवणी करायची की नाही, याचा फैसला उद्याच होण्याची दाट शक्यता आहे.
स्वबळावर लढण्याचा निर्णय बदलणार?
काँग्रेसने याआधी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे हा निर्णय मागे घेतला जाणार का? आणि काँग्रेस महाविकास आघाडीत सक्रियपणे सहभागी होणार का? यावर उद्याची बैठक निर्णायक ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत काँग्रेसचा हा निर्णय संपूर्ण राजकीय गणित बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
