नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा; युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन-सुरवसे पाटील यांची मागणी

नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा; युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन-सुरवसे पाटील यांची मागणी

नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Published by :
shweta walge
Published on

पुणे : राज्याचे मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सासवड येथे आयोजित एका कार्यक्रमात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व वायनाड च्या खासदार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याबाबत बोलताना केरळ या राज्याची तुलना थेट पाकिस्तानशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

केरळ हे मिनी पाकिस्तान असून खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. केरळ मधील अतिरेकी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना मतदान करतात. अतिरेक्यांच्या पाठिंब्यामुळे गांधी खासदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. राणेंच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मंत्री नितेश राणे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले. याप्रसंगी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, काँग्रेस कार्यकर्ते सचिन मोरे, बाबा मिसाळ हे उपस्थित होते.

नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, देशाची एकता, सहिष्णूता आणि अखंडतेला बाधा निर्माण करणारे विभाजनकारी, धार्मिक द्वेष पसरवणारे प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या, संविधानचा अपमान करणाऱ्या नितेश राणे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कडून केली आहे.

देशातील सर्वात जास्त साक्षर असणाऱ्या राज्याची तुलना आपल्या देशाचा शत्रू असणाऱ्या पाकिस्तान या राष्ट्राशी करत केरळ मधील लोकांना दहशतवादी म्हणणे हा लोकशाहीचा, संविधानाचा व केरळातील नागरिकांचा घोर अपमान आहे. असेही सुरवसे पाटील म्हणाले.

नितेश राणे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते मा.राहुल गांधी, खासदार मा.प्रियांका गांधी तसेच त्यांना निवडून देणाऱ्या समस्त जनतेचा आणि केरळ या राज्याचा अपमान केला आहे. हा संविधानातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणवल्या जाणाऱ्या मूल्यांवर व सिद्धांतांवर हल्ला असून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे. केरळ राज्यातील नागरिकांचा हा घोर अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com