News Planet With Vishal Patil: आणखी एका संरक्षक भिंतीचा घोटाळा उघड, LOKशाहीकडून मोठा पर्दाफाश
लोकशाही मराठी सातत्यानं मुंबईतील संरक्षक भिंतींचा घोटाळा उघड करत आहे. आणखी एक घोटाळा लोकशाहीनं उघड केला आहे. बोरिवलीच्या एक्सर डोंगरी भागात मुंबई झोपडपट्टी विकास मंडळानं अनेक ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्याचा दावा केला, मात्र सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. लोकशाहीच्या टीमनं बोरिवलीच्या एक्सर डोंगरी भागामध्ये सत्य परिस्थिती तपासली, तसंच त्याठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांसोबतही चर्चा केली.
मात्र, नव्यानं या भागात कोणतीही संरक्षक भिंत बांधण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भिंतींचं काम झालंय त्या पाच ते सहा वर्षांआधीच बांधण्यात आल्या होत्या. कागदावर या भिंती बांधण्यात आल्याचं दाखवून कोट्यवधी रुपये लाटण्याचं काम मुंबई झोपडपट्टी विकास मंडळाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे.
केवळ बोरिवली एक्सर डोंगरी विभागात 2013-14 पासून आतापर्यंत जवळपास 14 कोटींच्या संरक्षक भिंती बांधल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं मात्र या भिंती नव्यानं बांधण्यात आलेल्या नाहीत. सातत्यानं त्याच-त्याच भिंती बांधल्याचं दाखवून अधिकाऱ्यांनी पैसे बळकावल्याचं समोर येत आहे.