Kasturba Hospital : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद, नेमंक काय घडलं ?
थोडक्यात
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद
माझी काय चूक? पण संबंध जपण्यासाठी माफी मागितली : राजेंद्र कदम
मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात एका निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंचे पुस्तक ‘देव आणि देवळांचा धर्म’ भेट दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकामुळे काही महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि संबंधित कर्मचाऱ्यावर पुस्तक फेकून माफी मागण्यास भाग पाडले.
पुस्तक वाटल्यावर संताप
30 ऑगस्ट रोजी रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी आपल्या निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहकाऱ्यांना समाजप्रबोधनात्मक पुस्तके वाटली. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देव आणि देवळांचा धर्म’ हे पुस्तकही होते. मात्र, काही महिला परिचारिकांनी पुस्तकातील मजकुरामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आणि राजेंद्र कदम यांच्यावर पुस्तक फेकले. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट झाला आहे.
राजेंद्र कदम यांचा खुलासा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राजेंद्र कदम यांनी सांगितले, “मी फक्त एक समाजप्रबोधनपर पुस्तक वाटलं. माझी काय चूक? तरीही कार्यालयातील संबंध बिघडू नयेत म्हणून मी माफी मागितली. खरंतर मला माफी मागण्याची गरज नव्हती. मला चौकशीची अपेक्षा होती, मात्र मागील दोन महिन्यात कुठलीही कारवाई झालेली नाही. मला वाटतं की संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे.”
कामगार संघटनेचा निषेध
या घटनेनंतर मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक देण्यात काय गैर आहे? निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकणं आणि सार्वजनिकरित्या अपमान करणं हा गंभीर प्रकार आहे. संबंधित सहाय्यक अधिसेविका, परिचारिका व इतर महिला कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी,” असे कामगार संघटनांनी म्हटले आहे.
कामगार संघटनेचा निषेध
या घटनेनंतर मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक देण्यात काय गैर आहे? निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकणं आणि सार्वजनिकरित्या अपमान करणं हा गंभीर प्रकार आहे. संबंधित सहाय्यक अधिसेविका, परिचारिका व इतर महिला कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी,” असे कामगार संघटनांनी म्हटले आहे.
मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली. “मूर्खपणाच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणा वादाकडे नेलं आणि अनिष्ट प्रवृत्तीविरोधात लढा दिला. त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचे काम सुरू आहे. आम्ही या महिलेविरुद्ध योग्य त्या ठिकाणी तक्रार करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. प्रकरणी प्रशासनाने शांतता राखण्याचं आवाहन केलं असून, अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.