Pune University : पुण्यात फुले विद्यापीठात ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’ वक्तृत्व स्पर्धेवरून वादंग; एनएसयूआयचे आंदोलन सुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’ या वक्तृत्व स्पर्धेवरून मोठा वाद निर्माण झाला असून, एनएसयूआयसह विविध विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. विद्यापीठाच्या परिपत्रकाद्वारे ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी याला सरसकट विरोध दर्शवला आहे.
विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे की, ही स्पर्धा एका सामाजिक संघटनेच्या निवेदनानुसार आयोजित केली गेली असून, विद्यापीठाने त्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला आहे. “विद्यापीठ हे कोणत्याही राजकीय पक्षाचे पीआर एजन्सी नाही. जर उद्या इतर पक्ष किंवा संघटनांच्या नावाने अशा स्पर्धा घेतल्या गेल्या, तर विद्यार्थ्यांनी तेही सहन करावे का?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना इशारा देत म्हटले की, “विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न – विशेषतः वसतिगृह आणि इतर सोयीसुविधांचे प्रश्न – न सोडवता अशा स्पर्धांवर पैसे खर्च केले जात आहेत. स्पर्धा घ्यायची असेल तर ती संघाच्या शाखेत घ्या, विद्यापीठाच्या नावाखाली तिचा प्रचार करणे अमान्य आहे.”