Delhi : भारतीय पोशाख परिधान केला म्हणून दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला, व्हिडीओ व्हायरल
(Delhi)दिल्लीतील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 3 ऑगस्ट रोजी टुबाटा रेस्टॉरंटमध्ये भारतीय पारंपरिक पोशाख घातलेल्या एका जोडप्याला प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार मोबाईलवर चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये दिसतं की महिलेने सलवार-कुर्ती तर पुरुषाने टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केले होते. जोडप्याचा आरोप आहे की, “भारतीय पोशाख घातल्यामुळे आम्हाला प्रवेश नाकारला गेला, मात्र इतरांना कमी कपड्यांमध्येही सहज प्रवेश दिला जात होता.” त्यांनी पुढे रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन आणि भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचाही आरोप केला.
हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी संताप व्यक्त करत असून दुसरीकडे, टुबाटा रेस्टॉरंटकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. घटनेच्या गांभीर्याची दखल घेत दिल्ली सरकारने तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे.