covid-19
covid-19Team Lokshahi

कोरोना वाढतोय, सतर्क राहा; स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे आदेश

विशेषत: दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीकडे पाहता, केंद्र सरकारने पुन्हा एकदा राज्यांना गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात गर्दीचे कार्यक्रम टाळण्यास सांगितलं आहे. याशिवाय, सरकारने लोकांना मास्क घालण्याचं आवाहनही केलं आहे. सोशल डीस्टंसिंगच्या नियमांचं पालन करावं आणि हात नियमितपणे स्वच्छ ठेवावे जेणेकरून संसर्ग टाळता येईल अशा सुचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी काही निर्बंधांची पुन्हा अंमलबजावणी सुरू केली आहे.

दिल्ली सरकारने या आठवड्यात जाहीर केलं की आता पुन्हा मास्क घालणं अनिवार्य केलं जाईल. मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. मात्र, कारमधून प्रवास करणाऱ्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. एकाच दिवसात कोरोनाचे 16,561 नवीन रुग्ण आढळले असून सध्या देशातील सकारात्मकतेचा दर 5.44 टक्क्यांवर गेला आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, त्यात दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. विशेषत: दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे 2726 नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या 7 महिन्यांतील सर्वाधिक आकडा होता. याशिवाय राजधानीत 6 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र सरकारने राज्यांना सांगितलं आहे. अशा स्थितीत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना मोठी गर्दी होणार नाही याची काळजी राज्याने घ्यावी. याशिवाय प्रत्येकाने कोरोना प्रोटोकॉलचे पालन केलं पाहिजे जेणेकरून संसर्ग टाळता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com