भाजपाच्या विजयाच्या संकल्प मेळाव्याला तुफान गर्दी, मंत्री रविंद्र चव्हाणांनी दिले कार्यकर्त्यांना कानमंत्र
निसार शेख| रत्नागिरी: मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्याला आज तुफान गर्दी झाली. संपूर्ण हॉल कार्यकर्त्यांनी भरले होते तर काही कार्यकर्ते बाहेर उभे होते. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याप्रसंगी शत प्रतिशत भाजपाचा नारा देत भाजपा वाढवण्यासाठी अनेक टीप्स दिल्या.
मंत्री चव्हाण म्हणाले की, भाजपामध्ये कार्यकर्ताच नेता असतो. आपल्या खिशाला कमळ लावा. फ्रेंडस ऑफ बीजेपी वाढवा. केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वांना सांगा. आपला लोकसभा मतदारसंघ उजव्या विचारांचा असून यावेळी तो गड जिंकायचा आहे. केंद्रात आपले 400 पार सदस्य निवडून येणार आहेत, त्याकरिता संकल्प करूया, असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री चव्हाण यांच्या स्वागतासाठी ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री चव्हाण यांचे औक्षण केले. शिंदे-फडणवीस राज्य सरकारच्या योजनांचा मिळालेला लाभ आणि योजना आणि विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामपंचायतीमध्ये अभिनंदनाचे ठराव करा. सोशल मीडियाचा प्रभावी व योग्य वापर करा आणि आपल्या केंद्र, राज्यातील नेत्यांना फॉलो करा. मागील जि. प. निवडणुकीत आपल्याला एकही जागा मिळाली नाही. याचा बदला घ्यायचा आहे. असे भावनिक आवाहन भाजपा नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
जिल्ह्याला रस्त्यांकरिता 500 कोटींचा निधी दिला आहे. रोजगार देत आहोत. आपले जनसामान्यांचे सरकार आहे. जिल्ह्यात 2 लाख 52 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळाला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याकरिता आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत. शत प्रतिशत भाजपा हे आपले उद्दिष्ट आहे. किसान सन्मान योजना, नमो योजना, रोजगार संधी यासह सबका साथ सबका विकास हा मंत्र अमलात आणूनच आपण विजय मिळवू शकतो. आपल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास हवा. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होत असताना आपले विरोधक सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. त्याला आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे. फेसबुक, ट्विटर यांचा वापर करा. भाजप नेत्यांना फॉलो करा, रिट्विट करा, फॉरवर्ड करा, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.