Video : सणासुदीमुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी; सुरतमध्ये चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू
नवी दिल्ली : दिवाळी आणि छठ पुजेला घरी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्या रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. अशातच, सुरतमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुरत स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, रेल्वेचे कन्फर्म तिकीट असूनही मी ट्रेनमध्ये प्रवेश करू शकलो नाही. भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन आजकाल सर्वात वाईट आहे. पोलिसांकडून मदत मिळाली नाही. माझ्यासारख्या अनेकांना तिकीट असूनही ट्रेनमध्ये चढता आले नाही. ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की मला आत प्रवेश करता आला नाही. आत जे लोक आधीच हजर होते. त्यांनी रेल्वेच्या डब्याचा दरवाजाही बंद केला होता. ते कोणालाही ट्रेनच्या डब्यात येऊ देत नव्हते. एवढा मोठा जमाव पाहून पोलिसांनीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिला, असेही त्याने सांगितले.
सुरत रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत पश्चिम रेल्वे वडोदरा येथील पोलीस अधीक्षक सरोजिनी कुमारी यांनी सांगितले की, सुरत रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. वडोदराच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने (डीआरएम) सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत रेल्वे पोलिसांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले आहे. तर, रेल्वे स्थानकावर जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे काही प्रवाशांना चक्कर आल्याचेही पोलिसांनी सांगितले.