Markadwadi
Markadwadi

'या' गावात बॅलेट पेपरवर अभिरुप मतदान घेण्याच्या मतदारांच्या निर्णयानंतर जमावबंदीचे आदेश

EVM वर झालेल्या मतदानामध्ये घोळ असल्याचा आरोप करत बॅलेट पेपरवर अभिरुप मतदान घेण्याचा निर्णय सोलापूरातील मारकडवाडीच्या मतदारांनी घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दाखवत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हे अभिरुप मतदान रद्द करण्यात आलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

आमदार उत्तम जानकर हे 2009 पासून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यंदा मारकडवाडी मधून जानकरांना कमी मतं मिळाल्याचं समोर आलं. यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला. ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मारकडवाडीकरांनी बॅलेट पेपरवर अभिरूप मतदानाचा निर्धार केला. गोळ्या जरी घातल्या तरी मतपत्रिकेवर मतदान घेणारच असा एल्गार मारकडवाडीकरांनी केला होता.

मारकडवाडीकरांचा हा रौद्रावतार पाहिल्यानंतर पोलीसांनी जमावबंदीच्या आदेशाकडे बोट दाखवत गुन्हे दाखल करण्याची घोषणा करून टाकली. तर पोलिस मतदारांवर दबाव टाकत आहेत असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला होता. यानंतर पोलीस आणि आमदार उत्तम जानकर यांच्यात चर्चाही झाली. आमदार जानकर यांनी ग्रामस्थांसोबत देखील चर्चा केली. आणि अखेर बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान रद्द करण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी थेट शरद पवार, जयंत पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

ईव्हीएमविरोधात मारकडवाडीतील ग्रामस्थांनी एल्गार पुकारला. बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान जरी झाली नसलं तरी या विरोधाची दखल निश्चितपणे घेतली गेलीये. त्यामुळे भविष्यात ईव्हीएमविरुद्ध अशा प्रकारचे आंदोलन उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

  • आमदार उत्तम जानकर यांनी 2009, 2014 , 2019 अशा तीन विधानसभा निवडणुका लढवल्या.

  • तीनही विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावातून जानकर यांना 80 टक्के मतदान झाले.

  • 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जानकरांना 843 तर पराभूत उमेदवार राम सातपुते यांना 1003 मतं मिळाली.

  • माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येऊन सुद्धा जानकरांचा निसटता विजय झाला.

  • उत्तम जानकर एक लाख 25 हजार मतांनी निवडून येतील असा मोहिते पाटलांचा आणि जानकरांचा दावा होता.

  • मात्र उत्तम जानकर अवघ्या १२२६५ मतांनी विजयी झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com