Dada Bhuse : गर्जा महाराष्ट्र माझा!... आता शाळांमध्ये राष्ट्रगीतासोबतच राज्यगीत देखील बंधनकारक, शिक्षणमंत्री दादा भुसेंचा इशारा
आता शाळांमध्ये केवळ राष्ट्रगीत गाणेच नाही, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीतही सक्तीने गायले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
राज्यभरातील सर्व मराठी तसेच इतर माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे शाळेत दररोजच्या प्रार्थनेसोबत राष्ट्रगीतासोबतच 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत देखील गायलं जाणार आहे. "मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत दोन्ही मानवंदनेने गायले गेले पाहिजे. आणि आता हेच सर्व माध्यमांच्या शाळांनाही लागू आहे," असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे दहावीपूर्व शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातही भुसे यांनी महत्त्वाची घोषणा केली. येत्या काळात इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार असून, शिष्यवृत्तीधारकांची संख्याही वाढवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्याभिमान वृद्धिंगत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र या आदेशानंतर काही शाळांमध्ये अंमलबजावणीच्या अडचणी येऊ शकतात, यावर शिक्षण खातं काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.