गोविंदांना आसुडाने फटके; पनवेलमधील पारंपारिक देवांची दहीहंडी
हर्षल भदाणे पाटील, पनवेल
पनवेलमध्ये सुमारे तीनशे ते साडे तीनशे वर्षांपासून पारंपारिक ‘देवांची हंडी’ साजरी करण्यात येते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आयोजित केले जातात. पनवेल शहरात नवनाथाची शक्तिपीठे आहेत. त्या ठिकाणचे भक्त या उत्सवात सामील होऊन या ठिकाणच्या दहीहंडी फोडत असतात. विशेष म्हणजे येथील दहीहंडी ही मोठ्या उंचावर न बांधता ठरावीक उंचीवर दहीहंडी टांगून सर्व जण रिंगणामध्ये एकत्र येत असतात.
गोलाकार जमलेल्या गोविंदांना जाड्या दोरखंडाने (आसुडाने) फटके मारले जातात. हा एक परंपरेचाच भाग असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते. श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून या उत्सवाला सुरुवात होते. जन्माष्टमीच्या दिवशी पूजा आरती झाल्यानंतर मानाचे अस्थान म्हणजेच नवनाथांचे स्थान असलेली मंडळी चौकात येऊन त्यांच्या अंगावर आसुडाचे फटकारे मारण्यात आले.
परंतु हे फटकारे शिक्षा नसून भगवंताचा प्रसाद मानले जातात. पनवेल शहरातील पेशवेकालीन बापट वाडा, लाईन आळी, प्रभू आळी, हनुमान मंदिर, परदेशी आळी, जेष्ठ नागरिक हॉल समोर, जय भारत नाका, टपाल नाका, कुंभार वाडा आदी ठिकाणी पारंपारिक प्रथेप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. शेकडो वर्षे ही परंपरा सुरू असल्याने अनेक जणांनी मोठ्या उत्साहात ही दहीहंडी बघण्यासाठी गर्दी केली होती.