Tripura Student Tragedy : दिल्लीतील यमुना नदीत सापडला त्रिपुरी विद्यार्थिनीचा मृतदेह ; सर्वत्र खळबळ
दिल्ली विद्यापीठाच्या आत्मा राम सनातन धर्म महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १९ वर्षीय स्नेहा देबनाथ, ही त्रिपुरा येथील मूळ रहिवासी विद्यार्थिनी, गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होती. अखेर १४ जुलै रोजी तिचा मृतदेह यमुना नदीत गीता कॉलनी फ्लायओव्हरखाली सापडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
स्नेहा ७ जुलैपासून गायब होती. त्या दिवशी सकाळी ५:५६ वाजता तिचा शेवटचा कॉल झाला. तिने आईला सांगितले होते की, ती एका मैत्रिणीसोबत सराई रोहिल्ला रेल्वे स्थानकावर जाणार आहे. मात्र, पोलिस तपासात उघड झाले की, ती मैत्रीण तिला भेटलीच नव्हती.
तपासादरम्यान समोर आले की, स्नेहा कॅबने थेट सिग्नेचर ब्रिजवर गेली होती – एक अशा ठिकाणी, जिथे याआधी आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्या दिवशी ब्रिजवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नव्हते, त्यामुळे तिच्या हालचालींची कोणतीही दृश्य नोंद पोलिसांकडे उपलब्ध नाही.
पोलिसांना स्नेहाच्या होस्टेलमधून एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये तिने स्वतःला अपयशी समजल्याचे आणि कुटुंबावर ओझं असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच तिने लिहिले आहे की, “ही माझी स्वतःची इच्छा आहे, यामागे कोणताही गुन्हा नाही.” पोलिसांनी चिठ्ठी तपासात समाविष्ट केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
स्नेहाच्या वडिलांनी एफआयआर नोंदवण्यात झालेल्या ४८ तासांच्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जर सिग्नेचर ब्रिजवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असते, तर तिच्या हालचालींबाबत वेळेवर माहिती मिळाली असती, असेही त्यांनी म्हटले आहे.
तपासातून हेही समोर आले आहे की, स्नेहाने गेल्या चार महिन्यांत खात्यातून कोणतेही पैसे काढले नव्हते, ती गायब होताना कोणतीही वैयक्तिक वस्तू घेऊन गेली नव्हती, आणि तिने काही मित्रमैत्रिणींना भावनिक संदेश व ईमेल पाठवले होते. घटनेनंतर त्रिपुरातही संताप व्यक्त झाला असून, मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी याप्रकरणात दिल्ली पोलिसांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत.