Deccan Queen : 'दख्खनची राणी' झाली 96 वर्षांची; पुण्यात प्रवाशांनी केक कापून केला वाढदिवस साजरा
पुणे ते मुंबई दरम्यान रोज रेल्वेने प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन आज, 1 जून 2025 रोजी 96 व्या वर्षात पदार्पण करत आहे. खंडाळ्याच्या घाटातील निसर्गरम्य दृश्य दाखवत गेली 95 वर्षे अविरत चालणाऱ्या या डेक्कन क्वीनचा वाढदिवस पुणे रेल्वे स्थानकात दिमाखात साजरा करण्यात आला. पुण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह यांच्यावतीनं आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यातील रेल्वे चालकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा, पुणे रेल्वे स्थानक संचालक संजय कुमार, पुणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक रवींद्र धुमाळ आणि इतर रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा यांच्या माध्यमातून दरवर्षी डेक्कन क्विनचा वाढदिवस साजरा केला जातो. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेल्या आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळवलेल्या या डेक्कन क्वीनचा वाढदिवस दरवर्षी 1 जूनला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई पुणे या दोन शहरांचे एक विशेष नाते या डेक्कन क्वीनमुळे निर्माण झाले आहे. डेक्कन क्वीनच्या 'वेळेवर निघणे' आणि 'वेळेवर आगमन'च्या रेकॉर्डमुळे दोन्ही शहरांच्या प्रवाशांची ही क्वीन पहिली पसंती बनली आहे. गेल्या 95 वर्षांच्या इतिहासात ही ट्रेन दोन शहरांमधील केवळ वाहतुकीचं काम करत नसून मुंबई-पुणेकरांचा प्रवास सुखकर करण्याचे काम या गाडीने केले आहे.
1 जून 1930 रोजी ही 'डेक्कन क्वीन' जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा सुरुवातीला 7 डब्यांची 2 रॅकसह होती. प्रवाशांची वाढती मागणी, दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन या गाडीशी असलेले अतूट नाते त्यामुळे हळूहळू त्यात बदल करून आता ही ट्रेन 16 कोचच्या सुधारित डब्यांसह धावते. यामध्ये तीन वातानुकूलित चेअर कार, 9 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार यांचा समावेश आहे. दररोज हजारो प्रवासी या ट्रेनच्या माध्यमातून मुंबई ते पुणे प्रवास करतात.