Rajnath Singh On Pakistan : भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

Rajnath Singh On Pakistan : भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

SCO मंचावर दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांवर टीका
Published by :
Shamal Sawant
Published on

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनमधील छिंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार संघटना (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भाष्य करताना, शांती, सुरक्षितता आणि परस्पर विश्वासाचा अभाव ही आजच्या काळातील प्रमुख प्रादेशिक आव्हाने असल्याचे मत व्यक्त केले.

पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता, राजनाथ सिंह यांनी भारताला भेडसावणाऱ्या सीमा-पार दहशतवादाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "काही देश दहशतवादाला आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग मानतात आणि अशा शक्तींना संरक्षण देतात. SCO सारख्या मंचाने अशा दुटप्पीपणाला प्रोत्साहन देऊ नये. जर कोणी दहशतवादाला आश्रय देत असेल, तर त्यांच्यावर टीका करायला आपण मागे हटू नये."

हे विधान जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या एका भीषण हल्ल्यानंतर आले आहे. या घटनेत 26 नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एक नेपाळी नागरिक आणि स्थानिक घोडेवाले यांचा समावेश होता. ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, हा गट संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे मानले जाते. संरक्षणमंत्री यांच्या मते, या हल्ल्यात पीडितांची धार्मिक ओळख तपासून निशाणा बनवण्यात आला.

या परिषदेत SCO चे 10 सदस्य राष्ट्र सहभागी झाली असून, चीन यंदाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवते आहे. श्री. सिंह यांनी आपल्या भाषणात बहुपक्षीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, "सुधारित बहुपक्षीय संवाद प्रणाली ही देशांदरम्यान समन्वय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कोणतेही राष्ट्र एकटे राहून सर्व समस्यांना उत्तर देऊ शकत नाही."या बैठकीदरम्यान भारत, चीन आणि रशियामधील संरक्षण मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असून, सीमारेषा सुरक्षेबरोबरच दहशतवादविरोधी सहकार्य हेही प्रमुख मुद्दे राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com