Delhi Assembly Election Result : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आज निकाल; तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असा तिरंगी सामना अशी लढत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दिल्लीत निवडणूक निकालाची तयारी पूर्ण झाली असून दिल्लीमध्ये एकूण 19 मतमोजणी केंद्रे असणार आहेत.
मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 19 मतमोजणी केंद्रांवर सीएपीएफचे 38 पथक तैनात करण्यात येणार आहेत. दिल्लीत बुधवारी 60.54 टक्के मतदान झालं असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार असून दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष हॅट्रीक साधणार की भाजपचं कमळ फुलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.