MI vs DC, IPL 2024
MI vs DC, IPL 2024

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची दाणादाण उडाली आहे. चौथ्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरोधात १० धावांनी पराभव झाला.
Published by :

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची दाणादाण उडाली आहे. चौथ्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरोधात १० धावांनी पराभव झाला. जॅक फ्रेजर-मॅकगर्कने २७ चेंडूत ८४ धावांची वादळी खेळी केल्यानं दिल्लीनं २५० धावांचा टप्पा पार केला. या सामन्यात झालेल्या विजयामुळे दिल्लीचा प्ले ऑफच्या शर्यतीतला मार्ग सुकर झाला आहे. ट्रीस्टन स्टब्सने २७ चेंडूत नाबाद ४८ धावांची आक्रमक खेळी केली. स्टब्स आणि मॅकगर्कच्या धावांच्या जोरावर दिल्लीने ४ विकेट्स गमावून २५७ धावा केल्या होत्या. या धावांचं लक्ष्य गाठताना मुंबईने २० षटकांत ९ विकेट्स गमावून २४७ धावा केल्या. मागील पाच सामन्यांमध्ये चार विजय संपादन करणाऱ्या दिल्लीचा संघ १० गुण मिळवून पाचव्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्स नऊ सामन्यांमध्ये सहा गुण मिळवल्यानं नवव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सची सुरुवात दिल्लीप्रमाणे आक्रमक झाली नाही. इशान किशनने दुसऱ्या षटकात खलील अहमदला तीन चौकार ठोकून धावांचा वेग वाढवला होता. परंतु, चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद झाल्यानं मुंबईला मोठा धक्का बसला. ८ धावांवर असताना खलीलने रोहितला झेलबाद केलं. त्यानंतर पुढच्या षटकात सूर्यकुमार यादवने मुकेश कुमारला दोन चौकार मारले. पण याच षटकात ईशान किशन २० धावांवर असताना बाद झाला.

सूर्यकुमारने खलीलच्या षटकात एक चौकार आणि षटकार मारला होता. पण त्यानंतर त्याला धावांचा सूर गवसला नाही आणि तो १३ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. कर्णधार हार्दिक पंड्याने आक्रमक फलंदाजी करून २४ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकार ठोकून ४६ धावा केल्या. परंतु, मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर हार्दिक बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com