Delhi Heavy Rain : दिल्लीत मुसळधार पाऊस; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी
( Delhi Heavy Rain) दिल्ली आणि आसपासच्या भागात दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीची पाणी पातळी 207 मीटरवर पोहोचली असल्याची माहिती मिळत आहे. यमुना बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून एनडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात तैनात आहे. काही भागांमध्ये सुमारे पाच ते सहा फूट पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भारतीय हवामान खात्याने दिल्लीसह हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्येही पावसाचा प्रभाव तीव्र राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबसाठीही मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक राज्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडा, गाझियाबाद, शिमला, जम्मू-काश्मीर आणि चंदीगडमध्ये शाळा व महाविद्यालये आज बंद आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून सामान्य नागरिकांना कामावर जाण्यास अडचणी येत आहेत.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात पावसामुळे दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. कुल्लू, सुंदरनगर आणि चिदगाव येथे भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शिमला-कालका रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पाच सप्टेंबरपर्यंत रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालये हवामान सुधारण्यापर्यंत बंद करण्यात आली आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.