राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. अशातच शिवसेनेसह संभाजी राजे यांनी आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकाराला राज्यापालांविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समजत होती. मात्र, यावर राजभवनाने हे वृत्त फेटाळले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.