राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, "आमचे विचार मिळतेजुळते..."
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवतीर्थवर स्नेहभोजनासाठी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
याच भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज ठाकरे साहेबांनी मला जेवणाचे निमंत्रण दिलं होते. गेले काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर गेल्या 1-2 महिन्यांपासूनच भेटायचं ठरत होतं. सदिच्छा भेट होती. स्नेहभोजन झालं, गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, आठवणी निघाल्या. याचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही."
"आता आम्ही महायुतीत आहोत. महायुतीचे सरकार आहे. मी नेहमी जाहीरपणे सांगतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. यापुढेही येणाऱ्या निवडणुकीत महायुती चांगलं यश मिळवेल. आता निवडणुकांवर चर्चा करण्याची वेळ नव्हती. आम्ही नेहमी तयारीतच असतो. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना ही नेहमी काम करत असते. लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "निवडणुकांचा माहोल तयार झाल्यावर युती, महायुती ही चर्चा तेव्हा होते. पण आज कोणतीही युती, महायुतीची चर्चा नव्हती. केवळ आणि केवळी ही सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. लपवून ठेवण्याचे काही कारण नाही. काही असेल तर नक्की कळवू. विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही. राज ठाकरे हे लोकसभेत मोदी साहेबांच्यासोबत होते. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचे कारण काय आहे." असे एकनाथ शिंदे म्हणाले.