Folding Helmet ; संशोधकांची कमाल! दोन हेल्मेट कॅरी करण्याची चिंता मिटली; तयार केलं 'फोल्डिंग हेल्मेट'चं डिझाईन
नागपूर : राज्याच्या गृह विभागाने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट घालण्याची मध्यंतरी सक्ती करण्यात आली. परंतु या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. दुचाकीवर दोन हेल्मेट सांभाळायचं कसं? ठेवायचं कुठं? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र या समस्येवर आता उपाय मिळाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनीने 'फोल्डिंग हेल्मेट'चे जुगाड शोधून काढले आहे. या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट देखील मिळाले आहे. लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतूक नियमात बदल केले जातात. दुचाकीसाठी दोन्ही व्यक्तींना हेल्मेट घालण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून नुकतेच काढण्यात आले. यामुळे दोन हेल्मेट कुठे ठेवायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावरच आता डिक्कीत ठेवता येणार दोन हेल्मेट या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी यांनी संशोधन करून वाहनाच्या डिक्कीत राहू शकतील अशा 'फोल्डिंग' हेल्मेटची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या 'फोल्डिंग' हेल्मेटचे डिझाईन, कार्यपद्धती आणि मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेत नवीन तंत्रज्ञान वापरून ते तयार केले आहे. तसच १ ते दीड महिन्याच्या कालावधीत हे नाविन्यपूर्ण हेल्मेट तयार होणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांनी दिली.