Beed Sarpanch Santosh Deshmukh Case : बीडच्या संरपंचावर 150 वार, 56 गंभीर जखमा; संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली
संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणातील हत्यारांचा तपशीलवार अहवाल आता समोर आला असून, त्यातून या गुन्ह्याच्या क्रूरतेची कल्पनाही सुन्न करणारी ठरत आहे. गॅस पाइप, वाहनाच्या वायरचा चापक, लाकडी बांबू आणि लोखंडी रॉड अशा चार वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करून देशमुख यांच्यावर अत्यंत अमानुषपणे हल्ला करण्यात आला, हे आता स्पष्ट झालं आहे.
150 वार, 56 जखमा
शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानुसार देशमुख यांच्या शरीरावर तब्बल 150 हल्ल्यांचे व्रण आणि 56 गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. छाती, पाठ, हात, पाय आणि चेहरा – कोणताही अवयव या क्रौर्यापासून वाचलेला नव्हता. विशेष म्हणजे त्यांच्या फुफ्फुसालाही इजा झाली होती, हेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शॉकमुळे मृत्यू
या भीषण मारहाणीमुळे संतोष देशमुख शॉकमध्ये गेले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात "हॅमरेज अँड शॉक ड्यू टु मल्टिपल इंज्युरीज" ही मृत्यूची कारणं नमूद करण्यात आली आहेत, ज्यातून या हत्येची विक्राळता अधोरेखित होते.
हत्येतील हत्यारे आणि पुरावे
सीआयडीच्या तपासात हत्येसाठी वापरले गेलेले हत्यारे घटनास्थळी सापडले असून, त्यामधील लोखंडी पाइप इतक्या ताकदीने वापरला गेला की तो अक्षरशः 15 तुकड्यांमध्ये तुटला. हे सर्व तुकडे पुरावा म्हणून चार्जशीटमध्ये जोडले गेले आहेत. या हत्यारांचा वापर वाल्मिक कराड यांच्या टोळीने केल्याचा स्पष्ट उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
ही घटना केवळ गुन्हेगारीच्या मर्यादांपलीकडची असून, समाजातील वाढत्या हिंसाचाराचा आरसा ठरते. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना, तपास यंत्रणांपुढे आणि समाजासमोर गंभीर आव्हान निर्माण करते.