Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

'इंडिया' आघाडीवर फडणवीसांचं पुन्हा शरसंधान, कडेगावात म्हणाले, "राहुल गांधी, शरद पवार यांना..."

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. ते कडेगावमध्ये संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

महायुतीत एक पॉवरफुल इंजिन आहे. या इंजिनमध्ये आपण वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावून विकासाची ट्रेन तयार केली आहे. या विकासाच्या गाडीत दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, ओबीसी, मराठा, धनगर, सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपली विकासाची गाडी सबका साथ, सबका विकास म्हणत पुढे जात आहे. दुसरीकडे काय अवस्था आहे. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात, मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे. तिथे फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीत. इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हरला बसायला जागा असते. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीच बसू शकता. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेच बसू शकतात आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे बसू शकतात. तुमच्यासाठी यांच्या इंजिनमध्ये जागा नाही, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. ते कडेगावमध्ये संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस जनतेला संबोधीत करताना म्हणाले, देशाचा नेता कोण असेल, हे निवडण्याची ही निवडणूक आहे. पुढचे पाच वर्ष देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, देशाचा विकास कोण करु शकेल, कोण सर्वसामान्य माणसाला पुढे नेऊ शकतो, याचा निर्णय घेण्यासाठी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत दोनच पर्याय आहेत. महायुतीचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी एक पर्याय आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन नेत्यांमधील आहे. संजयकाकांना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत असेल, तर दुसऱ्या कुणाला दिलेलं मत हे राहुल गांधींना जाणार आहे.

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा अनेक लोकांना शंका होती. आता आम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता योजना होणारच नाहीत. आता सर्व पैसा विदर्भात जाईल. पण या दुष्काळी भागातील सर्व योजनांना सर्वात जास्त पैसा २०१४ पासून २०१९ पर्यंत मिळाला. आता आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर पैसै देण्याचं काम सुरु केलं. कारण आम्हाला दुष्काळी भागाची व्यथा समजते. आम्ही विस्तारित टेंभू योजनेला ७ हजार कोटी रुपये दिले. त्याआधाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला २६ हजार कोटी रुपये दिले. या योजना कधीही पूर्ण झाल्या नसत्या. पण मोदींनी दिलेल्या पैशांमुळे या सिंचनाच्या योजना पूर्ण होत आहे. गणपतराव देशमुखांची मला आठवण येते.

त्यांनी अनेक वर्षे सोलापूरच्या सांगोल्यात संघर्ष केला. त्यावेळी ५० हजार हेक्टरला आम्ही पाणी दिलं. त्यावेळी गणपतराव म्हणाले, जन्मभर मी विरोध केला. पण युतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी होते, म्हणून आमच्याकडे दुष्काळी भागात पाणी आलं. सबका साथ, सबका विकासाची मोदींची शिकवण आहे. अनेक लोकांनी याठिकाणी राज्य केलं, मंत्रिपदे भोगली. आपल्याला केवळ चॉकलेट दिले. त्यापलीकडे काहीही मिळालं नाही. देशात मोदींनी केलेला बदल आपण पाहत आहोत. देशात २० हजार लोक झोपडीत राहायचे, ते पक्क्या घरात आले. ५० हजार लोकांच्या घरात गॅस नव्हता, त्यांच्या घरात गॅस पोहोचला. ६० कोटी लोकांना पिण्याचं शूद्ध पाणी मिळालं. ८० कोटी लोकांना २०२० पासून मोदी मोफत रेशन देत आहेत.

पुढचे पाच वर्ष २०२९ पर्यंत ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. बाराबलुतेदारांना मोदींनी विश्वकर्मासारखी योजना देऊन १४ हजार कोटी रुपये दिले. आमच्या शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी दिला. ६०-६५ वर्षांचा विरोधकांचा इतिहास काढा आणि दहा वर्षांचा मोदींचा इतिहास काढा, साखर कारखानदारी आणि उसाच्या शेतकऱ्यासाठी मोदींनी जेव्हढे निर्णय घेतले, आजपर्यंतच्या इतिहासात एव्हढे निर्णय कधी घेतले गेले नाहीत. साखर कारखानदारीवर २५-३० वर्षे जवळपास १० हजार कोटी रुपयांची प्राप्तिकर विभागाची तलवार लटकली होती. तो इनकम टॅक्स मागील काळापासून मोदी सरकारने रद्द केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे १० हजार कोटी रपये वसुलीचे काम थांबले, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com