मी अजून अर्धच बोललो..., शरद पवारांवरील गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचं आणखी एक मोठं विधान
अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आम्ही विद्यमान विरोधी पक्षनेता अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारची स्थापना केली होती, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होत. त्यानंतर राजकीय गोट्यात चांगलीच खळबळ माजली होती. या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अजून अर्धच बोललो आहे. दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेलं जे काही आहे, ते सांगेन. मी एवढंच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका… म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही. असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चानां चांगलेच उधाण आले आहे.