"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

एकीकडे आपली पांडवांची सेना आहे. ज्या सेनेचे नैतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्यासोबत महायुतीतील सर्व घटकपक्ष आहेत, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील महायुतीच्या सभेत केलं.
Published by :

आपल्या सर्वांना कल्पना आहे, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. गल्लीचा नाही, दिल्लीचा नेता निवडायचा आहे. महापालिका, विधानसभा नाही, तर ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे. कोण देश चालवू शकतो, कोण देश समृद्ध करू शकतो, कोण गरिबाचं कल्याण करु शकतो, सामान्य माणसाच्या आशा, आकांशा आणि अपेक्षा कोण पूर्ण करु शकतो, देशाला कोण सुरक्षित ठेऊ शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत दोन बाजू तयार झाल्या आहेत. महाभारताच्या युद्धात एक बाजू पांडवांची होती आणि एक बाजू कौरवांची होती. एकीकडे आपली पांडवांची सेना आहे. ज्या सेनेचे नैतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्या सोबत महायुतीतील सर्व घटकपक्ष आहेत, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीचा समाचार घेतला. ते मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस इंडिया आघाडीवर टीका करत म्हणाले, दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात २४ पक्षांची खिचडी आहे. महायुतीचं सरकार येणार आणि मोदीजी प्रधानमंत्री होणार, हे पक्क झालं आहे. पण ज्यांच्याकडे २४ पक्षांची खिचडी आहे, त्यांना विचारा त्यांचा नेता कोण आहे, ते नेता सांगू शकत नाही. त्यांच्याकडे नेताच नाही. ते म्हणतात पाच वर्षात आम्ही पाच प्रधानमंत्री करू. मी म्हटलं, पाच वर्षात पाच प्रधानमंत्री कराल, मग पहिला पंतप्रधान कसा निवडाल? हे लोक संगीत खूर्चीचा खेळ करतील. एक खूर्ची मधे ठेवतील, त्याच्या बाजूला राहूल गांधी, अरविंज केजरीवाल, उद्धव ठाकरे, स्टॅलिन फिरतील.

संगीत बंद झाला की, जो पहिला खूर्चीवर बसला, तो पहिला प्रधानमंत्री. पुढच्या वर्षी जो बसला, तो दुसरा प्रधानमंत्री. मग तिसऱ्या वर्षी जो बसला, तो तिसरा प्रधानमंत्री. यांच्या परिवाराची निवडणूक नाही आहे. तुमच्या परिवाराचा प्रमुख नेमायचा नाही आहे. तुमच्या खासगी उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही. १४० कोटी जनतेच्या देशाचा प्रमुख याठिकाणी निवडायचा आहे. मोदीजी आपल्या गाडीचे इंजिन आहेत. वेगवेगळे पक्ष या गाडीचे डब्बे आहेत. या विकासाच्या गाडीत दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त, ओबीसी सर्वांसाठी जागा आहे. मोदींचं हे इंजिन सबका साथ, सबका विकास म्हणत विकासाकडे घेऊन जाणार आहे. पण राहुल गांधींकडे सर्व इंजिन आहेत. तिकडे डब्बे नाही आहेत. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. लालूप्रसादचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. अरविंद केजरीवाल म्हणतात मी इंजिन आहे. त्यांच्या इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते. त्यांच्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हरला बसायला जागा आहे. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासाठी जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंना जागा आहे. तुमच्यासाठी यांच्या इंजिनमध्ये जागा नाही.

म्हणून या विकासाच्या गाडीत आपल्याला पुढे जायचं आहे. मुरलीधर मोहोळ छोट्या पदावर काम करुन महापौर बनला आणि आता तुमच्या आशीर्वादाने खासदार बनणार आहे. कोविडच्या काळात नेते घरी बसले होते, पण मैदानात उतरून काम करणारा नेता कुणी असेल, तर ते मुरलीधर मोहोळ आहेत. गेल्या दहा वर्षात मोदींनी पुण्याचं चित्र बदललं आहे. पुण्यात मेट्रो आली. पुण्यात नदी सुधाराचा कार्यक्रम सुरु आहे. पुण्यात २० हजार घरे बांधली. पुण्यात २४ तास पाण्याची योजना होत आहे. सांडपाणी, ट्रॅफिक, रस्त्यांच्या योजना होत आहेत. मोदींनी या देशात चमत्कार केला आहे, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com