Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात PM मोदींची तोफ धडाडणार, फडणवीस म्हणाले; "कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रातील..."

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धेर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत.
Published by :

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धेर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. आम्हाला अतिशय आनंद आहे की, महालक्ष्मी अंबा मातेच्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. त्यांची भव्य सभा होणार आहे. लोकांची मोठी मागणी होती की, कोल्हापूरमध्ये सभा झाली पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनीही पंतप्रधानांना विशेष विनंती केली. कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रातील कोणताही भाग असो, मोदींना जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी टीका विरोधक करतात, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, निर्यात बंदी झाल्यावरही केंद्र सरकारने सातत्याने कांद्याची खरेदी केली. दरवेळी निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगीही दिली. आता तर खूप मोठी परवानगी देण्यात आलीय. विरोधकांना शेतकऱ्यांशी घेणंदेणं नाहीय. आपला एक मुद्दा संपला याचं दु:ख आहे त्यांना. शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही, याचं दु:ख विरोधकांना आहे. शेतकऱ्यांची कांदा निर्यात होणार आहे, त्यांनी खरंतर आनंद व्यक्त करायला हवा होता. पण त्यांनी आनंद व्यक्त केला नाही, तर दु:ख व्यक्त करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी घेणंदेणं नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी निवडून देणं धोक्याचं आहे, असं शरद पवार म्हणाले होते, यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, शरद पवारांसाठी ते धोक्याचं आहे. त्यांच्या पक्षासाठी धोक्याचं आहे. त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे, त्यासाठी ते धोक्याचं आहे. पवारांनी वैयक्तिक मत मांडलं आहे. मोदींनी महाराष्ट्र आणि देशासाठी जे केलं आहे, ते देशाने पाहिलं आहे. म्हणूनच लोक आम्हाला मत देत आहेत. मागील दोन्ही निवडणुकीसाठी जेव्हढ्या सभा झाल्या होत्या. तेव्हढ्याच सभा यावेळीही महाराष्ट्रात होत आहेत. त्यावेळी एका दिवशी दोन-तीन सभा मोदी करत नव्हते. पण यावेळी ते एका दिवशी दोन-तीन सभा घेत आहेत.

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात मोदींनी सभा घेतली आहे, हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, कोण आहेत संजय राऊत...जागावाटपाचा तिढा सुटलेला आहे, लवकरच त्याबद्दल घोषणा केली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com