Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

"भारती पवारांना यावेळीही सर्वात जास्त लीड मनमाडमधूनच मिळणार आहे, एकदा तुम्ही लीड दिली की, उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे"
Published by :

Devendra Fadnavis On Bharti Pawar : भारती पवारांना यावेळीही सर्वात जास्त लीड मनमाडमधूनच मिळणार आहे. एकदा तुम्ही लीड दिली की, उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून या एमआयडीसीत उद्योगही आणू. याचसोबत गिरणा धरणातून, पांजण डाव्या कालव्यातून पाण्याची मागणी आहे. माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे. या सर्व मागण्या पूर्ण होतील. तुम्ही माझ्याकडे आणि शिंदे साहेबांकडे जेव्हा येता, तेव्हा कधीच रिकाम्या हाताने जात नाहीत. आम्ही तुमच्यासाठी बिअरर चेकसारखे आहोत. तुम्ही थेट त्याच्यावर स्वत:चं नाव लिहू शकता. २० तारखेला निवडणूक होऊद्या. २१ तारखेला मिटिंग लावतो आणि या सर्व गोष्टी निकाली लावतो, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या नाशिक येथील प्रचारसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला एव्हढच करून थांबायचं नाहीय. भारती पवारांना आणि मोदींनी निवडून दिल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे वाहून जातं, ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक, नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे. त्याची योजना आम्ही तयार केली आहे. त्यासाठी ६०-७० हजार कोटी रुपये लागतील. मला विश्वास आहे, तिसऱ्यांदा मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले की, हे ६०-७० हजार कोटी रुपये आम्ही मोदींकडून आणू. नाशिक, नगर आणि मराठवाड्यातला पाण्याचा संघर्ष कायमचा इतिहास जमा करू आणि या भागाला आम्ही पाणीदार करू. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल.

मी नश्चितपणे सांगू शकतो, सुहास कांदे यांच्यासोबत माझा जुना परिचय आहे. गेले पाच वर्ष काम करताना त्यांना पाहतोय. जनसामान्यांकरिता काम करणारा आमदार म्हणून सुहास कांदे यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. तुमच्यासाठी लढणारा माणूस आहे. माझ्याकडे ते जेव्हा पाण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं. मी शंभर वेळा उद्धव ठाकरेंकडे गेलो आणि सांगितलं की, मनमाडची नगरपालिका गरिब नगरपालिका आहे. ९० कोटी रुपये भरायचे आहेत. ते आम्ही भरू शकत नाही.

आम्हाला लोकवर्गणी माफ करा. ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं द्या. पण एव्हढे पत्र लिहिले, इतक्या वेळा जाऊन भेटलो, पण मला ते मिळालं नाही. मी म्हणालो, सुहासजी चिंता करु नका. आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलं आहे. एका झटक्यात मी ते पैसे मंजूर केले. मला विश्वास आहे, दहा टक्के काम बाकी आहे. त्या दहा टक्क्यांच काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वात मनमाड शहरात रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी आलेलं निश्चितपणे पाहायला मिळेल.

नांदगावसह ७८ गावांची योजना असेल, सर्व योजना मिळून साडेतीन हजार कोटी रुपये सुहास कांदे यांनी आणले. मोठ्या मोठ्या शहरांत जे स्टेडियम नाही, तसं ३५ कोटी रुपयांचं स्टेडियम मनमाडमध्ये बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणून मी सुहास कांदे यांचं अभिनंदन करतो. मागच्या वेळीही सर्वात चांगला लीड मनमाडने दिला आहे, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com