CM Devendra Fadnavis On Mahadevi : "...त्यामुळे ती पुन्हा तिथेच यायला हवी" 'महादेवी' हत्तीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा ठाम पुढाकार? फडणवीसांचे मोठं विधान
नांदणी (जि. कोल्हापूर) येथील मठातील ‘महादेवी’ हत्तीला पुन्हा मठात आणण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी महादेवी हत्तीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिल्यानंतर, मागील आठवड्यात तिचे स्थलांतर करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून ती हत्ती पुन्हा नांदणी मठात परत यावी, यासाठी तीव्र मागणी होत आहे. रविवारी यासाठी निदर्शने देखील झाली.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, "राज्य सरकार पूर्ण ताकदीने मठाच्या पाठीशी आहे. हत्तीणीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार केले जाणार आहे. मठाने जर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर राज्य सरकारही याचिकेसाठी पुढाकार घेणार आहे".
"महादेवी हत्ती परत यावी, ही सर्वांची इच्छा आहे. महादेवी हत्ती मागील 34 वर्षांपासून नांदणी मठात आहे. त्यामुळे ती पुन्हा तिथेच यायला हवी", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीदरम्यान स्पष्टपणे सांगितले. या निर्णयानंतर महादेवी हत्तीच्या प्रकरणात आता राज्य सरकारही थेट सहभागी होणार असून, पुढील टप्प्यात कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.