किती आहे देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती?
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपने एकमताने घेतलेल्या निर्णयानंतर त्यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बुधवारी विधानभवनात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी फडणवीस यांची एकमताने भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती आहे?
(माय नेता या वेबपोर्टलने दिलेल्या आकडेवारीनुसार)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांच्या निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी 13.27 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता घोषित केली आहे.
दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांचे 2023-24 मध्ये एकूण उत्पन्न 79.3 लाख रुपये होते. जे मागील वर्षीच्या 92.48 लाख रुपयांच्या उत्पन्नापेक्षा कमी होते.
फडणवीस यांनी त्यांच्या नावावर 56.07 लाख रुपये, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर 6.96 कोटी रुपये आणि त्यांच्या मुलीच्या नावावर 10.22 लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याकडे 23,500 रुपये रोख आहेत तर त्यांच्या पत्नीकडे 10,000 रुपये रोख असल्याचं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
त्यांच्या बँक खात्यांमध्ये मुदत ठेवी आणि वित्तीय संस्था, NBFC आणि सहकारी संस्थांमधील ठेवी यासह 2.28 लाख रुपये आहेत तर त्यांच्या पत्नीच्या खात्यात 1.43 लाख रुपये आहेत.
फडणवीस यांनी बाँड, डिबेंचर्स, शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही तर एनएसएस, टपाल बचत, विमा पॉलिसी आणि आर्थिक साधनांमध्ये 20.70 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पत्नीने बॉण्ड्स, डिबेंचर्स, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये 5.62 कोटी रुपये गुंतवले आहेत, असे प्रतिज्ञापत्रात दिसून आले आहे.
त्यांच्याकडे ३२.८५ लाख रुपये किमतीचे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याचे त्यांनी जाहीर केले होते, तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६५.७ लाख रुपयांचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.
रिअल इस्टेटच्या बाबतीत, फडणवीस यांनी त्यांच्या नावावर 4.69 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. ज्यामध्ये चंद्रपूरमधील शेतजमीन, नागपुरातील धरमपेठेतील निवासी इमारत आणि इतर अनेक मालमत्ता आणि पत्नीच्या नावावर 95.29 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
फडणवीस यांच्यावर बँका किंवा वित्तीय संस्थांचे कोणतेही कर्ज नसून त्यांच्या पत्नीचे ६२ लाख रुपये कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट झाले आहे.