Devendra Fadnavis On Nitesh Rane : "मंत्र्याने आपला राजधर्म पाळावा" फडणवीसांनी पुन्हा एकदा राणेंना धारेवर धरलं
नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये औरंगजेबच्या कबरीवरून पेटलेल्या वादावर तसेच मल्हार सर्टिफिकेट मुद्द्यावरून नितेश राणे यांना कार्यालयात बोलावून तंबी देत वादग्रस्त विधान टाळा असं खडसावलं होत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांची देखील भेट घेतली होती. त्यादरम्यान भाजपच्या शीर्षनेतृत्वाने पुढील काही दिवस नितेश राणे यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर आज मुंबईतील राजभवनात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर 2025 पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्काराला अनेक नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यादरम्यान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत, मंत्र्याकडून धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांबद्दल मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी फडणवीसांनी नितेश राणे यांचं नाव न घेता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका विधानाचा उल्लेख करत नितेश राणेंना पुन्हा एकदा धारेवर धरल आहे.
जयंत पाटलांनी विचारलेला प्रश्न
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मुलाखत घेत असताना असा प्रश्न केला की, सरकारमधील काही जबाबदार मंत्र्याकडून तसेच नेत्यांकडून समाजात तेढ वाढवणारे विधान केले जातात आणि विधान करताना चुकीची भाषा वापरतात. त्यामुळे समाजात वाद निर्माण होतात, यावर तुमची भूमिका काय?
देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर
"मला असं वाटतं की, जेव्हा आपण मंत्री असतो त्यावेळेस संयमानेच बोललं पाहिजे. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, हा उल्लेख अटलबिहारी वाजपेयींनी केला होता की, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळावा लागतो. म्हणून आपले विचार काय आहेत? आपली आवड, नावड काय आहे, हे बाजूला ठेवून, आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे संविधानाने आपल्याला कुणासोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. आपण जे काही बोलत आहोत त्यामुळे समाजात कुठेही तेढ निर्माण होणार नाही. याचा विचार करून तरुण मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळून बोललं पाहिजे. ते जे काही वक्तव्य करतात त्यानंतर मी त्यांच्यासोबत संवाद करतो आणि त्यांना समजावतो तुम्ही मंत्री आहात, त्यामळे संयम बाळगून बोललं पाहिजे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.