उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात कुणाल कामराचे गाणं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक गाणं म्हटले. हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल असून कुणाल कामरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराच्याविरोधात आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
कुणाल कामराविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्टँडअप कॉमेडियन करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. कामराला हे माहिती पाहिजे की, महाराष्ट्राच्या जनतेचं 2024साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणाकडे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेनं ठरवले आहे. त्यामुळे अशाप्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे. त्यांच्याबद्दल अशाप्रकारचा अनादर करण्याचा कुणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचे आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुम्ही जरुर कॉमेडी करा, व्यंग करा पण जर अपमानित करण्याचे काम जर कुणी करेल तर हे सहन केले जाणार नाही. हे चुकीचे आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचे पुस्तक दाखवतात त्यांनी जर संविधान वाचले असेल किंवा संविधानाची जर त्यांना माहिती असेल तर संविधानानेच सांगितले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. आमची मागणी आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.