मराठी माणसाला कल्याणमध्ये मारहाण, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये मराठी माणसाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं बाहेरच्या टोळीला बोलावून सोसायटीमध्ये मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झाले आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशाप्रकारचे उद्गार त्याठिकाणी काढलं, भांडण केलं, मारामारी केली. त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे. हा अखिलेश शुक्ला एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर आणि पत्नीवर दोघांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई याठिकाणी करण्यात येत आहे. पुढील कारवाई पोलीस करतील.
कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचे कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहणार. कधी कधी काही नमुने चुकीचे वक्तव्य करतात, माज आणल्यासारखे करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचे सरकार आले म्हणून हे झाले अशाप्रकारचा त्याला राजकीय रंग देण्याचे कारण नव्हते. मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला? कोणाच्या काळात झाला. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे.
मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधानपरिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की, कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.