मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आज संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच ठाकरेंच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असल्याचं ते म्हणाले.
बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही 31 निर्णय घेतले होते. 2017 मध्ये यातील 10 विषय मार्गे लागले होते. तर आज घडीला यातील 23 विषय मार्गे लागली असून, 7 विषय प्रगतीपथावर असल्याचं फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाला भरीव निधी देण्यासाठी चर्चा करण्यात आली. सीड पार्क आणि बियाणे उत्पादनाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यातील 600 ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 180 कोटी निधी मंजूर करण्यात आला. जल सिंचन आणि धरण उभारणीसाठी 8 हजार कोटींची निधी देण्याबाबत चर्चाही करण्यात आली.