Devendra Fadnavis : परप्रांतियांवर दोन थोबाडीत मारून विकास होणार नाही; फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर थेट टीका करत विकासाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली. मराठी माणसाला मुंबईबाहेर जावं लागणं म्हणजे प्रगती नाही, असं सांगत परप्रांतियांविरोधातील आक्रमक भूमिका हीही विकास नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. मराठी अस्मिता महत्त्वाची असली तरी मराठी माणूस संकुचित विचारांचा नाही, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर सर्वांचा विकास आणि सुरक्षितता गरजेची आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हिंदुत्वाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, आमचं हिंदुत्व पूजा-पद्धतीपुरतं मर्यादित नाही. भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये मानणारे सगळेच आमच्यासाठी हिंदू आहेत. त्यामुळे विकास आणि हिंदुत्व वेगळे होऊ शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या कामांचा आढावा घेतला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करत त्यांनी ही युती प्रेमासाठी नाही, तर राजकीय भीतीपोटी झाल्याचं म्हटलं. एकूणच महाराष्ट्रातील जनता विकासाच्या बाजूने ठाम उभी आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
थोडक्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर थेट टीका केली.
विकासाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली: मराठी माणसाला मुंबईबाहेर जावे लागणे म्हणजे प्रगती नाही.
परप्रांतियांविरोधातील आक्रमक भूमिका ही विकासासाठी योग्य नसल्याचे ठसवले.
मराठी अस्मिता महत्त्वाची, पण मराठी माणूस संकुचित विचारांचा नाही, असे फडणवीस म्हणाले.
मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, तसेच सर्वांचा विकास आणि सुरक्षितता गरजेची असल्याचे स्पष्ट केले.

