Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"आम्ही पक्ष फोडत नाहीत, घरही फोडत नाहीत, पण..." पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

पुण्यात पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
Published by :

Devendra Fadnavis Press Conference : उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती अशी आहे की, त्यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावं आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करा. आम्ही घर फोडणारे नाही आहोत. आम्ही पक्षही फोडत नाहीत, पण कुणी सोबत आला तर आम्ही त्याला संधी देतो. कुटुंबाला पहिलं प्राधान्य दिल्यामुळं शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अशी परिस्थिती झाली. शरद पवार राष्ट्रवादीचा चेहरा नक्कीच असतील, पण जमिनीवर पक्ष उभा करण्यासाठी अजित पवारांनी मेहनत घेतली. आमदारांचाही अजितदादांना पाठिंबा होता. अजित पवारांना सातत्यानं डावललं गेलं. प्रत्येक वेळी त्यांन समोर करायचं आणि मग तोंडघशी पडायचं. त्यांना व्हिलन करायचं. या पद्धतीमुळे अजित पवारांनी निर्णय बदलला. अस्तित्वाचा विचार करावा लागतो, त्यावेळी असे निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, बारामतीची जागा अजित पवार जिंकणार आहे, असं शरद पवारांना वाटलं. त्यानंतर पवारांनी म्हटलं, ४ जूननंतर पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील. निवडणुकीचा निकाल काय आहे, हे पवार साहेबांना समजतंय. काँग्रेस डुबती नाव आहे. काँग्रेससोबत जाऊन तुम्ही वाचू शकणार नाहीत. शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावं, ज्यामुळे त्यांचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, पण याचा अर्थ ऑफर होत नाही. त्यांना सल्ला दिला होता. आधीच तुम्ही डुबले आहेत आणि आता परत तुम्ही डबत्या नावेत चालले आहात, अशाप्रकारचा तो सल्ला आहे.

ज्या ज्या वेळी पक्ष कमजोर झाला, त्या त्या वेळी शरद पवार काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोजिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले. १९७७ पासून आजपर्यंत पाहिलं तर, जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो, तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलिन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. ज्यांना याचा इतिहास माहितीय त्यांना याचा अर्थ कळतोय. तोच संदर्भ मोदींनी दिला होता. त्यांनी ऑफर दिली नव्हती. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक सुरु आहे. विशेषत: पुण्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष्य आहे. पुणे ही महाराष्ट्राची विद्येची, संस्कृतीची राजधानी म्हणून आपण पाहतो. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे.

सामान्य माणसाला काम मिळण्यासाठी, त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजेंडा काय आहे, या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकडेही लक्ष दिलं. गावांच्या विकासाचे प्रश्न आपण वर्षानुवर्षे मांडत होतो. पण शहरंही विकसित झाली पाहिजेत, असा विचार केंद्र सरकारने केला. आपण महाराष्ट्राचं शहरीकरण बघितलं, पुणे तुलनेनं विकसित शहर आहे. पण या शहरातही काही प्रमाणात बकालपणा दिसतो. कारण ग्रामिण भागातून लोक शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी शहरांमध्ये आले, त्यावेळी त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. शहरीकरण म्हणजे आपल्याला अभिषाप वाटायचा. भारत गावांमध्ये राहतो, अशी आपली मानसिकता होती, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com