Dhananjay Munde vs Anjali Damania : "अर्धवट ज्ञान आणि खोटे आरोप...",धनंजय मुंडे यांची अंजली दमानियांवर बोचरी टीका
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक युद्ध सुरु आहे. एकमेकांवर धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया आरोप करताना दिसून येतात. अशातच आता पुन्हा अंजली दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीबाबत मुंडे तसेच त्यांच्या खात्यावर आरोप केले होते. मात्र आता धनंजय मुंडे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात एक ट्वीट केले आहे. त्यांनी सरकारी जीआर काढण्याची कार्यप्रणाली नेमकी कशी चालते? याची सविस्तर माहिती घ्यावी अशी टीका केला आहे. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून, जीआर काढला वगैरे आरोप केले ते संपूर्णपणे चुकीचे आहेत. त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत आहेत. शासनाच्या कार्य नियमावलीनुसार जीआर अर्थात शासन निर्णय पुढे करण्यासाठीची एक पद्धत आहे, त्यासाठी प्रक्रिया आखून देण्यात आलेली आहे.
नंतर त्यांनी लिहिले की, "विभागातील कक्ष अधिकाऱ्याने त्या प्रकरणाची फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस्तव येत असते, मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी व झाल्या नंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी स्वतः ती फाईल तपासतात आणि त्या नंतरच तो शासन निर्णय निर्गमित होत असतो. त्यामुळे खोटे बोलून जीआर काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे आणि आपल्या अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करणे असे आहे".
पुढे त्यांनी लिहिले की, "अंजली दमानिया यांनी गेल्या पंधरा वर्षात ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या, ज्या कोणाविरुद्ध आरोप केले त्यातील एकही आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात अथवा इतरत्र कोठेही सिद्ध होऊ शकलेला नाही. त्याचेही कारण अर्धवट माहिती हाच असावा. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाही, भासवून गोष्टी करण्यासाठी ती अंजली दमानिया यांची प्रेस कॉन्फरन्स आहे का?", असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.